प्रतिनिधी / अशोक आव्हाळे
मांजरी (ता.१) : पुणे-सोलापूर रोडवरील उन्नत महामार्गासाठी प्रस्तावित जमीन मोजणीच्या पार्श्वभूमीवर राहुलदादा शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली हडपसर ते उरुळी कांचन परिसरातील शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासमवेत महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच झाली. यावेळी जुन्या जमीन संपादनातील त्रुटी, प्रलंबित मोबदला आणि नव्या संपादनाची हद्द याबाबत शेतकऱ्यांनी विविध प्रश्न उपस्थित केले.
सन २००४ किंवा त्यापूर्वी झालेल्या जमीन संपादनाची प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने झाल्याची बाब शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच पूर्वी संपादित केलेल्या अनेक जमिनींचा मोबदला अद्याप संबंधित शेतकऱ्यांना मिळालेला नसल्याचेही सांगण्यात आले.
सन २००४ मधील जमीन संपादनाची हद्द आणि आता होणाऱ्या नव्या संपादनाची हद्द कशा पद्धतीने निश्चित केली जाणार, तसेच शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला किती व कोणत्या पद्धतीने मिळणार, याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली.काही ठिकाणी पूर्वी जमीन संपादन करताना सलगता न राखल्याने गरजेपेक्षा अधिक जमीन संपादित झाल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. त्यामुळे प्रत्येक गावातील शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन महामार्गासाठी आवश्यक तेवढीच जमीन संपादित करावी आणि जमिनीचा योग्य बाजारभाव द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
नव्याने नोटिसा देण्याची मागणी
प्रकल्प अधिकारी विठ्ठल उदमले यांचीही शेतकऱ्यांनी भेट घेतली. संबंधित शेतकऱ्यांना नव्याने नोटिसा द्याव्यात.प्रत्येक सर्व्हे क्रमांकाचा स्पष्ट उल्लेख करावा आणि नोटीस संबंधित शेतकऱ्याला प्रत्यक्ष मिळेल याची दक्षता घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.
प्रत्येक गावात स्वतंत्र बैठक घेऊन शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतरच पुढील मोजणीची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही तसेच प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळेल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यावेळी दिली.
बैठकीस माजी नगरसेवक शिवाजी भाऊ पवार, कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तात्या तुपे, संभाजी हाके, विजय कोद्रे, चंद्रकांत शेवाळे, शेवाळेवाडीचे माजी सरपंच बाळासाहेब मोरे, अमित गुंड, लोणीचे माजी उपसरपंच राजेंद्र काळभोर, निखिल काळभोर, निवृत्ती आंबेकर, नानासाहेब कुंजीर, विजय गायकवाड, शुभम तुपे, संतोष कांचन, प्रसाद भोर, संदीप कांचन, प्रशांत वाघ, गणेश आढाव, सम्राट चौधरी, विशाल चौधरी, संतोष देवकर, मनोज वाघ यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.
