प्रतिनिधी/अशोक आव्हाळे
मांजरी (प्रतिनिधी): पुणे शहर व परिसरात वाढत्या ट्रान्सफॉर्मर (डीपी) चोरीच्या घटनांचा तपास करताना गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ७ च्या पथकाने मोठी कारवाई करत ट्रान्सफॉर्मर चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे १२ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पुणे शहर पोलीस आयुक्तालय तसेच आसपासच्या परिसरात ट्रान्सफॉर्मर चोरीच्या घटनांबाबत गुन्हे शाखेचे युनिट क्रमांक ७ तपास करीत होते. यावेळी पोलीस अंमलदार विनायक साळवे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, वडगाव (ता. हवेली) परिसरात डीपी चोरी करणारे आरोपी येणार आहेत. या माहितीची खातरजमा करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचला.
या कारवाईत मोहम्मद साहेबजान मंगरेखान (वय ३०, रा. गोटेमाळ, सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे), आदर्श चंद्रप्रकाश पांडे (वय २२, रा. सदर) आणि चंद्रसेन शिवरतन धारीया (वय २८, रा. सदर, मूळ उत्तर प्रदेश) या तिघांना ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी मागील पाच ते सहा महिन्यांच्या कालावधीत लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडगाव, अष्टापूर, सांगवी सांडस, न्हावी सांडस व हिंगणगाव परिसरातून आठ डीपी/ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या धातूच्या तारा चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२४(६) तसेच भारतीय विद्युत अधिनियम कलम १३६ अन्वये एकूण आठ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांतील अंदाजे १२ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपींना दिनांक ६ सप्टेंबर २०२६ रोजी अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) गोहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. कारवाईत पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे, पोलीस अंमलदार विनायक साळवे यांच्यासह युनिट ७ च्या पथकातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.डीपी चोरीच्या आणखी घटनांचा तपास सुरू असून, या टोळीचे इतर साथीदार व चोरीचा माल कोणाला विकला जात होता, याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.
