प्रतिनिधी /अशोक आव्हाळे
मांजरी (प्रतिनिधी) : ढोल-ताशा, टाळ-मृदंगाच्या गजरात मांजरी खुर्द व कोलवडी परिसरात सोमवारी गणरायाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मंडळांनी विधिवत पूजा-अर्चा करून बाप्पांची प्रतिष्ठापना केली.
गणेशमूर्ती घरी आणण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांची मूर्ती विक्री केंद्रांवर गर्दी झाली होती. विविध गणेश मंडळांनी साध्या पद्धतीने तसेच मिरवणुकीसह गणरायाचे स्वागत केले. यामध्ये मांजरी खुर्द येथे श्री चिंतामणी मित्र मंडळ, शिवक्रांती, सुवर्णयुग, अष्टविनायक, थोरात ग्रुप, महाराणा प्रताप, श्री दत्त, आदर्श तसेच कोलवडीतील वाघजाई मित्र मंडळ,साई विश्व, आदी मंडळांनी गणरायाचे स्वागत करीत मिरवणुकीने उत्साहात प्रतिष्ठापना केली.
घरगुती गणेशमूर्तींची पूजा, आरती व मंत्रोच्चाराने प्रतिष्ठापना करण्यात आली. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि बालगोपाळांनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने परिसर भक्तिमय झाला आहे.
आगामी दिवसांत विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
दरम्यान, गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा करण्याचे आवाहन वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी केले आहे. परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
