प्रतिनिधी /भगवान खुर्पे
श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी ता. शिरुर येथे मेन चौक प्रतिष्ठान आणि ग्रामस्थ यांच्या माध्यमातून प्रवीणकुमार जगताप व प्रा. संदीप गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली श्याम गवारे, ॲड. संतोष गवारे, महादेव पवार, बाबू यादव, पोलीस पाटील शरद लोखंडे यांसह अन्य युवकांनी भीमा नदीच्या घाटावर गणेश विसर्जनाच्या दिवशी सुमारे अठराशे किलो निर्माल्य संकलित केले. विसर्जन घाटावर पर्यावरण पूरक संदेशाचे २२ फलक लावण्यात आले होते. अशाप्रकारे पर्यावरणाची जनजागृती करून अनोखी सामाजिक बांधिलकी जपली आहे. सदर निर्माल्य खड्ड्यात टाकून त्याचे विघटन केले जाणार असल्याचे संदीप गवारे यांनी सांगितले.
यावेळी सर्व गणेश भक्तांनी नदीच्या पाण्यात निर्माल्य न टाकता निर्माल्य संकलन करणाऱ्या कार्यकर्त्यांकडे हे निर्माल्य जाग्यावर आणून दिले व फक्त गणेशमूर्तीचे विसर्जन शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनमंत गिरी यांच्या सूचनेनुसार यावर्षी प्रथमच बनवण्यात आलेल्या कृत्रिम हौदामध्ये करण्यात आले. त्यानंतर स्वयंसेवकांच्या माध्यमातून बोटीच्या सहाय्याने भीमा नदीच्या स्वच्छ पाण्यात या मूर्ती गणेश आंबेकर, बाळासाहेब गोंडावळे, चंद्रकांत गवारणे, रामदास शिंदे या स्वयंसेवकांच्या माध्यमातून विसर्जित करण्यात आल्या. घाटावरील गणेश विसर्जनासाठी आलेल्या गणेश भक्तांनी येथील राबवला जाणारा निर्माल्य संकलनाचा उपक्रम अतिशय स्तुत्य व कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
निर्माल्य संकलन उपक्रमास जिल्हा परिषद सदस्या दिपालीताई गव्हाणे यांनी भेट देऊन युवकांनी राबविलेल्या पर्यावरण पूरक उपक्रमाचे कौतुक केले. प्रशासनाच्या माध्यमातून गणेश मूर्ती दान स्वरूपात घेऊन या नदीचे प्रदूषण आणखी कसे रोखता येईल या स्वरूपाचा भविष्यकाळात उपक्रम राबवला जाईल असे गव्हाणे यांनी सांगितले. यावेळी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सदिच्छा भेट देऊन भीमा नदीच्या परिसराची व निर्माल्य संकलन उपक्रमाची पाहणी केली. व निर्माल्य संकलन टीमचे विशेष कौतुक करून सांगितले की, अशा प्रकारचे उपक्रम सर्वत्र राबवण्याची खरी गरज आहे. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघचालक संभाजी गवारे, भाजपाचे जयेश शिंदे, तंटामुक्तीचे अध्यक्ष बाळासाहेब गवारे, माजी मुख्याध्यापक भाऊसाहेब वाघ, माध्यमिक शिक्षक संघाचे राज्य प्रवक्तेदादासाहेब गवारे, सुधीर ढमढेरे, गोरक्षनाथ क-हेकर, विजय शिंदे, सतीश बनकर, मुख्याध्यापक संघाचे तालुका सचिव बाळासाहेब चव्हाण, आनंदाश्रम शाळेचे मुख्याध्यापक संदीप गोसावी, आदी मान्यवर उपस्थित होते.श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी येथील मेन चौक प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या १३ वर्षापासून भीमा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी गावातील अनेक युवक एकत्रित येऊन गणेश विसर्जनाच्या दिवशी निर्माल्य संकलनाचा उपक्रम राबवत आहेत.
श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी गावातील युवकांनी राबविलेला निर्माल्य संकलन हा पर्यावरण पूरक असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या सर्व गावांमध्ये येथील युवकांनी मार्गदर्शन केल्यास निर्माल्य संकलन चळवळ उभी करता येईल असे शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सांगितले.
श्रीक्षेत्र विठ्ठलवाडीच्या भीमा नदीच्या स्वच्छ पाण्यामध्ये गणपती विसर्जन करण्यासाठी हजेरी लावली होती. विठ्ठलवाडी, तळेगाव ढमढेरे, शिक्रापूर यांसह अन्य गावातील व वाड्या वस्त्यांवरील तसेच चंदन नगर व मार्केट यार्ड पुणे येथील गणेश मंडळांचे गणपती व घरगुती गणपती मूर्तीचे भीमा नदीच्या पाण्यामध्ये विसर्जन करण्यात आले.
