प्रतिनिधी /अशोक आव्हाळे
मांजरी (प्रतिनिधी) : हवेली तालुक्याचे ऐतिहासिक वैभव असलेल्या किल्ले सिंहगडाच्या स्मारकाच्या जतन व दुरुस्तीच्या कामांसाठी शासनाकडून ९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीमुळे सिंहगडाच्या ऐतिहासिक वास्तू, तटबंदी व स्मारकांच्या संवर्धनाला मोठी चालना मिळणार असल्याची माहिती हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज हिरामण काकडे यांनी दिली. सिंहगड हा पुणे जिल्ह्याच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाचे महत्त्वपूर्ण प्रतीक आहे. किल्ल्याचे पूर्वीचे नाव कोंढाणा असून, १६७०च्या लढाईत नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाशी या गडाचा इतिहास जोडलेला आहे.
मंजूर निधीतून किल्ल्यावरील ऐतिहासिक वास्तूंची जतन, संवर्धन व आवश्यक दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. तसेच पर्यटक व शिवप्रेमींसाठी आवश्यक सुविधांच्या विकासालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे. सिंहगडाच्या संवर्धनासाठी शासनाच्या गड-किल्ले व स्मारक जतन योजनेतून निधी उपलब्ध करण्याची तरतूद आहे. सिंहगडाच्या जतनासाठी निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार व एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, आमदार भीमराव तापकीर, आमदार ज्ञानेश्वर कटके तसेच महायुती सरकारच्या हवेली तालुक्याच्या वतीने सभापती युवराज हिरामण काकडे यांनी आभार मानले.
