प्रतिनिधी /भगवान खुर्पे
तळेगाव ढमढेरे, दि. २६ (वार्ताहर) : ढोल-ताशांचा गजर, डिजेच्या तालावर, भक्तिमय वातावरणात तळेगाव ढमढेरे येथे गणेश विसर्जन मिरवणुका उत्साहात पार पडल्या. गावातील विविध गणेश मंडळांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत शिस्तबद्ध पद्धतीने गणरायाला निरोप दिला.
गावातील मुख्य बाजारपेठेतून विसर्जन मिरवणुका मार्गस्थ होत असताना रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. डीजेच्या तालावर युवकांनी उत्साहात सहभाग घेतला, तर महिला, बालक आणि ज्येष्ठ नागरिकांनीही मिरवणुकीचा आनंद घेतला. विविध मंडळांकडून करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई, सजावट आणि गणरायाच्या जयघोषामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिरवणुकीत सहभागी झालेल्या मंडळांनी नियोजित क्रमाचे पालन करत आपापल्या वेळेनुसार सहभाग घेतला. यामध्ये १) दुर्गामाता गणेश उत्सव मंडळ, २) मुंजोबा गणेशोत्सव मंडळ, ३) शिवगर्जना मित्र मंडळ, ४) जय बजरंग गणेश उत्सव मंडळ, ५) भीमाशंकर मित्र मंडळ, ६) क्रांतिवीर तरुण मंडळ, ७) जय मल्हार मित्र मंडळ, ८) जय भवानी मित्र मंडळ आणि ९) रामेश्वर मंडळ या मंडळांच्या मिरवणुका शिस्तबद्ध आणि सुरळीतपणे संपन्न झाल्या. कार्यकर्त्यांनी गर्दीचे नियोजन तसेच भाविकांना मार्ग मोकळा करून देण्यासाठी सहकार्य केले.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या वतीने आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गिरी, सहायक फौजदार प्रशांत गायकवाड, पोलीस हवालदार अमोल चव्हाण यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नियोजन केले.मिरवणुकीत महिला, मुली, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष देण्यात आले. गर्दीच्या ठिकाणी पोलिसांकडून आवश्यक खबरदारी घेण्यात आली. वाहतूक सुरळीत राहावी.
तसेच मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून दक्षता घेण्यात आली.
प्रशासनाच्या आवाहनाला मंडळांचा प्रतिसाद
गणेशोत्सवाच्या काळात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत पोलिस प्रशासनाने मंडळांना मिरवणूक शांततेत आणि शिस्तीत पार पाडण्याचे आवाहन केले होते. महिला सुरक्षा, ध्वनिप्रदूषण, विद्युत रोषणाई, मिरवणुकीतील शिस्त आणि नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतली गेली.
दरम्यान, संत नामदेव गणेश मित्र मंडळ, अमरज्योत मित्र मंडळ व सिद्धेश्वर तरुण मंडळाच्या गणपतींचे दुपारी विसर्जन करण्यात आले. गणरायाला निरोप देताना ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.
गणेशोत्सवातील उत्साह, भक्ती आणि सामाजिक सलोखा कायम ठेवत तळेगाव ढमढेरेतील विसर्जन मिरवणुका उत्साहपूर्ण वातावरणात, शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाल्या.
