पुणे /प्रतिनिधी
मांजरी ता.१५ : वाघोली (ता.हवेली) येथील श्री वाघेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त मध्यरात्रीपासून लाखो भाविकांनी हर हर महादेवाचा जयघोष करत दर्शनासाठी गर्दी केली होती. दिवसभर आबालवृद्ध, महिलांनी वाघेश्वर मंदिरातचा परिसर भक्तीमय वातावरणात गजबजून गेला होता. मध्यरात्री स्वरसाधना भजनी मंडळाने आपली भजन सेवा मोठ्या भक्तीमय वातावरणात केली. याला भाविकांनी मोठा प्रतिसाद दिला. महाशिवरात्रीनिमित्त वाघोली व परिसरातून भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्रीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहादरम्यान दररोज किर्तन सेवा व भाविकांना अन्नप्रसाद वाटप करण्यात आला.
महाशिवरात्रीनिमित्त मंदिरावरती आकर्षक विद्युत रोषणाई,सुबक रांगोळी व आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. मंदिर परिसरात फुलं, खेळणी, प्रसादाची दुकाने थाटल्याने वाघोली परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. शनिवारी रात्री महाभिषेक झाल्यानंतर भाविकांची दर्शनासाठी रांग सुरू झाली अशी माहिती वाघोली विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र सातव यांनी दिली. अनेक सामाजिक संघटना व दानशूर व्यक्तींच्या वतीने भाविकांना लस्सी, केळी व फराळाचे वाटप करण्यात आले होते. वाघोली पोलीस व वाघोली विकास प्रतिष्ठानच्या वतीने भाविकांना दर्शन सुरळीत घेता यावे यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड व गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पल्लवी मेहेर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर लोणीकंद वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल कोळंबीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुकीचे नियोजन करण्यात आले होते.
