प्रतिनिधी /अशोक आव्हाळे
मांजरी (प्रतिनिधी) : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला (पीडीसीसी बँक) राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाच्या वतीने राज्यातील ‘बेस्ट को-ऑपरेटिव्ह बँक’ पुरस्काराने गौरविण्यात आले. देशातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये व्यावसायिक उलाढालीच्या बाबतीत बँकेने उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला.
मंगळवारी (दि. २२) नवी दिल्ली येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पीडीसीसी बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे आणि संचालक मंडळाने हा पुरस्कार स्वीकारला.यावेळी संचालक भालचंद्र जगताप, प्रवीण शिंदे, निर्मला जागडे, पूजा बुट्टे पाटील, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शितोळे, उपसरव्यवस्थापक अभिजीत हेगडे आदी उपस्थित होते.
बँकेच्या पारदर्शक कारभारासह सभासद व ग्राहकांचा विश्वास तसेच संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे हा सन्मान मिळाल्याची भावना बँकेच्या वतीने व्यक्त करण्यात आली. या पुरस्काराबद्दल बँकेच्या सभासद, ग्राहक आणि हितचिंतकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
