प्रतिनिधी /अशोक आव्हाळे
मांजरी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळविल्याबद्दल तनिष्कचा पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. तनिष्कने मिळविलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, आमदार बापूसाहेब पठारे, आमदार शंकरभाऊ मांडेकर, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवलबाबा जगदाळे, उपाध्यक्ष विवेकदादा वळसे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, शिक्षण अधिकारी दहितुले मॅडम, तसेच जिल्हा परिषदेचे सभापती व अधिकारी यांच्या हस्ते तनिष्कचा गौरव करण्यात आला.
उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळविणे ही अत्यंत कौतुकास्पद बाब असून, तनिष्कने आपल्या अभ्यासातील सातत्य, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे.त्याच्या या यशामुळे पालक, शिक्षक आणि परिसरातील नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
“तनिष्कच्या यशामुळे जिल्हा परिषद शाळेतील गुणवत्तापूर्ण शिक्षणाची ओळख अधिक दृढ झाली असून, त्याने इतर विद्यार्थ्यांसमोरही एक आदर्श निर्माण केला आहे,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. तनिष्कच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्याचे पालक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन तसेच ग्रामस्थांनी अभिनंदन करून त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
