प्रतिनिधी /अशोक आव्हाळे
मांजरी (प्रतिनिधी) :मांजरी (प्रतिनिधी) : मांजरी खुर्द येथे केसनंद केंद्राची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद क्रमांक २ सोमवार (ता. ३१) रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांजरी खुर्द येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. परिषदेस केंद्रांतर्गत विविध जिल्हा परिषद शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, अध्ययन-अध्यापन प्रक्रिया अधिक प्रभावी करणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याबाबत परिषदेत सविस्तर चर्चा करण्यात आली.यावेळी केंद्रप्रमुख सचिन यादव यांनी बदलत्या शैक्षणिक पद्धतीनुसार अध्यापनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे, वाचनाची आवड वाढविणे आणि विविध उपक्रमशील अध्यापन पद्धतींचा वापर करण्याचे आवाहन शिक्षकांना केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैशाली काटे यांनी केले. चर्चात्मक मार्गदर्शन सत्रात ‘निपुण भाषा आकलनासह वाचन’ या विषयावर ज्ञानेश्वरी परदेशी, तर ‘निपुण गणित मापन संकल्पना’ या विषयावर विजय बदक यांनी मार्गदर्शन केले. प्रशासकीय विषयांवर केंद्रप्रमुख सचिन यादव यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले.
परिषदेदरम्यान शिक्षकांनी आपल्या शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांची माहिती देत अनुभवांची देवाणघेवाण केली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी ओळखून त्यावर प्रभावी उपाययोजना करण्याबरोबरच पालक व ग्रामस्थांचा शाळेच्या विकासात सहभाग वाढविण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.
शिक्षण परिषदेमुळे शिक्षकांना शैक्षणिक नियोजन, अध्यापनातील आधुनिक पद्धती आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी उपयुक्त मार्गदर्शन मिळाले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत सातत्याने सुधारणा करण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.यावेळी पंचायत समितीच्या सदस्या सुषमा मुरकुटे,माजी सरपंच विलास आबा उंद्रे, उद्योजक सुरेश उंद्रे, लक्ष्मण नेवाळे,सागर उंद्रे, दिपक उंद्रे,शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सोनाली मुरकुटे, पत्रकार अशोक आव्हाळे, राहुल उंद्रे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक विजय बदक व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उल्का ठाकूर यांनी केले. नवनाथ शेळके यांनी आभार मानले, तर सुवर्णा लडकत यांनी कार्यक्रमाचा समारोप केला..
