मांजरी खुर्द जिल्हा परिषद शाळेत आदर्श शाळा निर्मितीसाठी सहविचार सभा
प्रतिनिधी /अशोक आव्हाळे
मांजरी (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेच्या शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करण्यासाठी शिक्षक, पालक व ग्रामस्थांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. आदर्श शाळा ही केवळ शाळेची नव्हे, तर संपूर्ण गावाची सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन हवेली पंचायत समितीच्या उपसभापती विद्याताई गायकवाड यांनी केले.
मांजरी खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत ‘रयतेची शाळा’ या संकल्पनेतून शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष गावभेट दौरा व सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी शाळेची पाहणी करून शैक्षणिक व भौतिक विकासाबाबत चर्चा करण्यात आली.
वाबळेवाडी येथील आदर्श शाळेचे मार्गदर्शक सतीश वाबळे यांनी मार्गदर्शन करताना, “शाळेत रोबोटिक्स शिक्षण, पाणी आडवा-पाणी जिरवा, विषयमित्र, झाडे लावा-झाडे जगवा, स्वच्छता अभियान, एकोपा, शिस्त तसेच विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवावेत. कमी वेळेत प्रभावी अभ्यास कसा करता येईल, याचे नियोजन करून शाळेचा सर्वांगीण विकास साधावा,” असे सांगितले.
मांजरी खुर्द शाळेला आदर्श शाळा पुरस्कारासाठी पात्र करण्याच्या दृष्टीने शिक्षक, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी एकत्रितपणे नियोजन करून प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. मुख्याध्यापक विजय बदक व शिक्षकवृंद ग्रामस्थांच्या सहकार्याने शाळा आदर्श करण्यासाठी विविध उपक्रम राबवत असल्याचे सांगण्यात आले.
शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे, शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे तसेच शाळेचा भौतिक विकास करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहन विद्याताई गायकवाड यांनी केले.
यावेळी पंचायत समिती सदस्या सुषमा मुरकुटे, पोलीस पाटील भारती उंद्रे, वाबळेवाडीचे मार्गदर्शक सतीश वाबळे, जालिंदरनगर शाळेचे तंत्रस्नेही मार्गदर्शक कौस्तुभ कानडे, विस्तार अधिकारी संदीप गीते, केंद्रप्रमुख सचिन यादव, माजी सरपंच स्वप्निल उंद्रे, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष रमेश उंद्रे, माजी ग्रामपंचायत सदस्य अभिजीत उंद्रे, गौतम भोसले, धर्मेंद्र मोरे, पत्रकार अशोक आव्हाळे, सोनाली मुरकुटे, मुख्याध्यापक विजय बदक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आजी-माजी पदाधिकारी, माजी विद्यार्थी, युवक व शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
