गुन्हे शाखा युनिट-७ची कारवाई; कोल्हापूर जिल्ह्यातून आरोपीला घेतले ताब्यात
प्रतिनिधी /अशोक आव्हाळे
पुणे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) दाखल असलेल्या गुन्ह्यात दीड वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-७च्या पथकाने कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर परिसरातून जेरबंद केले. सुनील रविंद्र पाटील (वय ३०, रा. लेन नं. १३, राजाराम पाटील नगर, खराडी, पुणे; सध्या रा. ५२ झोपडपट्टी, शाहूनगर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपी सुनील पाटील हा फरार होता. या गुन्ह्यात भारतीय दंड संहितेसह महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाई करण्यात आली होती. आरोपीचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखा युनिट-७चे पथक कार्यरत होते.
पोलिस अंमलदार किरण पलांडे यांना मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी हा जयसिंगपूर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर येथे लपून राहत असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राहुल कोळपे यांच्यासह पोलिस अंमलदार गिरीश नाणेकर, अमोल ढोणे व किरण पलांडे यांच्या पथकाने जयसिंगपूर येथे जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला.आरोपी सध्या जयसिंगपूर येथील एका ठिकाणी राहत असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून १९ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे दोन वाजता त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आपले नाव व पत्ता सांगितला. त्यानंतर आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी खराडी पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलिस उपआयुक्त (आर्थिक व सायबर) तथा अति कार्यभार (गुन्हे) विवेक मासाळ, सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे)-२ राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली, युनिट-७चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
