प्रतिनिधी / भगवान खुर्पे
तळेगाव ढमढेरे, दि. १९ (वार्ताहर) : तळेगाव ढमढेरेच्या कुस्ती क्षेत्राला अभिमान वाटावा अशी कामगिरी पै. प्रतिक्षा प्रवीण ढमढेरे हिने केली आहे. राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धेत दमदार कामगिरी करत प्रतिक्षाने २३ वर्षांखालील ७६ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले.
दि. ५ व ६ सप्टेंबर २०२६ रोजी मथुरा, उत्तर प्रदेश येथे झालेल्या ११व्या स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ इंडिया नॅशनल चॅम्पियनशिप २०२६ मध्ये तसेच दि. १३ व १४ सप्टेंबर २०२६ रोजी जयपूर, राजस्थान येथे झालेल्या स्कूल स्पोर्ट एज्युकेशन असोसिएशन ऑफ इंडिया १७व्या ओपन नॅशनल स्कूल स्पोर्ट चॅम्पियनशिप २०२६ मध्ये प्रतिक्षाने सहभाग घेतला.
७६ किलो वजनी गटात प्रतिस्पर्ध्यांवर मात करत सुवर्णपदकाची कमाई करत तिने आपल्या कुस्तीतील कौशल्य, जिद्द आणि मेहनतीची छाप राष्ट्रीय आखाड्यात उमटवली. तिच्या या यशामुळे तळेगाव ढमढेरेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
प्रतिक्षाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिचे मार्गदर्शक नरेश्वर तालमीचे वस्ताद योगेश भांडवलकर , श्रीकांत भांडवलकर व तळेगाव ढमढेरे परिसरातून तिचे अभिनंदन होत असून, आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंनीही जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर यश मिळवू शकते, हे प्रतिक्षाने आपल्या कामगिरीतून दाखवून दिले आहे.
