प्रतिनिधी /अशोक आव्हाळे
मांजरी, ता. १६ : कचऱ्याने भरलेला ओढा आणि त्याचा काठ, त्यावर झंडीने भटकणारी भटकी कुत्री, रापलेल्या पाण्याची दुर्गंधी, पाणी पुरवठ्याचा अभाव आणि चिखल मातीने भरलेला खाचखळग्यांचा रस्ता, आदी विविध समस्यांच्या गर्तेत येथील रंगीचा ओढा परिसर सध्या सापडला आहे. पालिका प्रवेशाच्या साडेपाच वर्षानंतरही येथे विकासाचे कवाडही उघडलेले नाही. त्यामुळे परिसरात राहणाऱ्या सुमारे पाच हजार नागरिकांना दैनंदिन मोठी कसरत करावी लागत आहे.
या परिसरात अभ्यास स्कूल, कल्याणी स्कूल या शाळा, अभिज्ञा पार्क, साई समर्थ कॉलनी, कल्याणी गार्डन, साई समर्थ पार्क, ओम पार्क, श्रीनाथ नगर, चिंतामणी अंगण, घुले कॉलनी, कल्याणी पार्क, साई शिव सोसायटी, श्री गार्डन, जिजाऊ नगरी, साईनगर, शुभारंभ पार्क, स्वामी समर्थ पार्क, शिवनगरी आधी सोसायटी आहेत. आमदार चेतन तुपे पाटील यांच्या सुमारे साडे आठ लाख रुपयांच्या निधीतून रस्त्याच्या काही भागाच्या कॉंक्रिटीकरण शिवाय या भागात अद्याप कोणतीही सुविधा येथे पोहचलेली दिसत नाही.
येथून पूर्व-पश्चिम वाहणाऱ्या ओढ्यातून निव्वळ ड्रेनेजचे पाणी वाहत आहे. हे पाणी ठिकठिकाणी साचून राहिले आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साठला असून परिसरात त्याची दुर्गंधी पसरली आहे. याशिवाय या ओढ्याच्या काठावर ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग लागलेले आहेत. रस्त्यावर इजा करण्यासाठी ओढ्यावर चार-पाच ठिकाणी विकसकांनी पूल उभारलेले आहेत. तेही वाहतुकीला धोकादायक झालेले आहेत. कच्च्या रस्त्यावर मोठे खड्डे पडलेले आहेत. थोडा पाऊस झाला तरीही ते चिखलाने भरून जात आहेत. वाहने घसरून पडत आहेत. पादचाऱ्यांना कसरत करत प्रवास करावा लागत आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत.
सांडपाणी वाहिनीसह पाण्याचीही वानवा :
या भागात पालिकेकडून पाणीपुरवठाही होत नाही. त्याचे नियोजनही झालेले दिसत नाही. त्यामुळे येथील नागरिकांना पिण्याचे पाणी दुसरीकडून वाहून आणावे लागत आहे.सांडपाणी वाहिनी नसल्याने थेट नाल्यात हे पाणी सोडले जात आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरून आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान याबाबत प्रभाग समिती अध्यक्ष प्रशांत तुपे म्हणाले, “रंगीचा ओढा परिसर नव्याने विकसित झालेला भाग असल्याने त्याठिकाणी सार्वजनिक सुविधा अपुऱ्या आहेत. स्थानिक नगरसेवकांना बरोबर घेऊन तेथील सर्व समस्या जाणून घेतल्या जातील. त्यानंतर प्राधान्य क्रमाने एकेक करून येथील प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासनाला प्रस्ताव देऊ.”
“आम्हाला सध्या बोअरचे अथवा बाहेरून पाणी आणून तहान भागवावी लागत आहे. रस्ते, कचरा व्यवस्थापन, वीज अशा समस्यांना दररोज तोंड द्यावे लागत आहे. पालिकेत समाविष्ट होऊन साडेपाच वर्षे झाली. आमच्याकडून कर वसूल केला जातो, वेळेत न भरल्यास दंडही द्यावा लागतो. मग सुविधा पुरविण्यास उशीर का, असा आमचा प्रश्न आहे. पालिकेने त्याबाबत गांभीर्याने घ्यावे.”
सचिन घारे – स्थानिक नागरिक
“संबंधित परिसराची पाहणी करून सध्या तातडीने कचरा, ड्रेनेज, दिवाबत्ती असे प्रश्न मार्गी लावले जातील. रस्ते व पाणी याबाबत मुख्य खात्याला प्रस्ताव देऊन लवकरात लवकर तेही प्रश्न सोडविण्यात येतील.”
कुणाल धुमाळ – सहाय्यक आयुक्त, हडपसर – मांजरी क्षेत्रीय कार्यालय.
