प्रतिनिधी /अशोक आव्हाळे
मांजरी, ता. १२ : मांजरी खुर्द (ता. हवेली) परिसरात बिबट्याची दहशत कायम असून, शुक्रवारी मध्यरात्री माणिकनगर परिसरात बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या गायच्या वासरावर हल्ला करून त्याचा फडशा पाडल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
माणिकनगर येथील शेतकरी दत्तात्रय त्रिंबक उंद्रे यांच्या गट क्रमांक ९४३ मध्ये घराशेजारी गोठा असून, त्यामध्ये गाई, वासरू व इतर जनावरे बांधण्यात आली होती. गोठ्याभोवती कंपाऊंड असतानाही बिबट्याने कंपाऊंडमध्ये प्रवेश करून बांधलेल्या वासरावर हल्ला केला. यात वासराचा मृत्यू झाला.
दररोजच्या वेळेप्रमाणे दत्तात्रय उंद्रे हे शुक्रवारी सकाळी गाईची धार काढण्यासाठी गोठ्यात गेले असता त्यांना वासरू मृतावस्थेत आढळून आले. बिबट्याच्या हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन माजी सरपंच स्वप्निल उंद्रे यांनी वनविभागाचे कर्मचारी ज्ञानेश्वर शिवले यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच वन कर्मचारी ज्ञानेश्वर शिवले यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृत वासराचा पंचनामा केला. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
“शेतकऱ्यांनी एकट्याने शेतात जाऊ नये. शक्यतो दोघांनी किंवा समूहाने शेतात जावे.
रात्रीच्या वेळी शेतात जाणे टाळावे आणि नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी,” असे आवाहन वन कर्मचारी ज्ञानेश्वर शिवले यांनी केले.दरम्यान, कोलवडी आणि मांजरी परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून, यापूर्वीही पाळीव प्राण्यांवर हल्ल्याच्या घटना घडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी रात्रीच्या वेळी शेतात जाणे धोकादायक ठरत आहे. “शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी जायचे तरी कसे?” असा सवाल स्थानिक शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
मांजरी खुर्द परिसरातील बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी माजी सरपंच स्वप्निल उंद्रे व पंडित उंद्रे यांनी केली आहे.
