प्रतिनिधी /अशोक आव्हाळे
मांजरी (प्रतिनिधी) : सार्वजनिक गणेशोत्सव २०२६ शांततेत व सुरक्षित वातावरणात पार पडावा, यासाठी वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मांजरी खुर्द ग्रामपंचायत कार्यालयात गणेशोत्सव मंडळे, ढोल पथक चालक व नदी विसर्जनासाठी होडी चालकांची बैठक घेण्यात आली.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पोलीस व ग्रामपंचायतीची परवानगी घेणे बंधनकारक असून, अद्याप परवानगी न घेतलेल्या मंडळांनी दोन दिवसांत परवानगी घ्यावी, असे आवाहन गायकवाड यांनी केले. उत्सव काळात ध्वनिक्षेपकाची मर्यादा पाळावी, मिरवणुकीतील देखाव्याची उंची मर्यादित ठेवावी तसेच महिलांना त्रास होणार नाही, याची मंडळांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. गणेश विसर्जनावेळी नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये तसेच होडीत बसू नये.
गणेशमूर्ती होडी चालकाकडे देऊन विसर्जन करावे. होडीत नागरिक आढळल्यास संबंधित होडी चालकावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा गायकवाड यांनी दिला.होडी चालकांनी लाईफ जॅकेटचा वापर करावा, अशी सूचनाही करण्यात आलीगायकवाड यांनी नदीघाट व परिसरातील रस्त्यांची पाहणी करून विसर्जनाच्या नियोजनाबाबत ग्रामपंचायत व पोलीस पाटील यांना सूचना दिल्या..
पुलावरून किंवा नदीच्या कठड्यावरून मूर्ती पाण्यात फेकू नये तसेच निर्माल्य नदीत टाकू नये, असे आवाहनही त्यांनी केले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कारवाई करण्यात येईल, तसेच भविष्यात परवानगी देताना त्याची दखल घेतली जाईल, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले. यावेळी पोलीस पाटील भारती उंद्रे, पोलीस कर्मचारी हराळे, सत्यवान सावंत, विठ्ठल सावंत यांच्यासह मंडळांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
