अशोक आव्हाळे
मांजरी, ता. १० : दिवसेंदिवस प्रवाशांची गर्दी वाढू लागलेल्या मांजरी रेल्वे स्थानकावर विविध सुविधांचा अभाव दिसून येत आहे. तर, उपलब्ध सुविधा वापरायला अगोदरच मोडकळीस आलेल्या आहेत. त्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी या स्थानकावर काही महिन्यांपूर्वी पादचारी पूल, स्वच्छतागृहे, प्रतिक्षालय, पिण्याचे पाणी कोंडाळे यासारख्या सुविधा देण्यात आल्या होत्या. सध्या मात्र या सुविधांचा संपूर्णपणे बोजवारा उडाला असून नागरिकांची त्या वाचून मोठ्या प्रमाणात कुचंबणा होत आहे. पादचारी पुलावर मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य आहे. त्याच्या जिन्याखालीही घाण, मद्याच्या बाटल्या, माती व दगड असून अवतीभोवती गवत उगवले आहे. याच पादचारी पुलाखाली शहराकडे जाणाऱ्या बाजूला महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृहे आहेत. मात्र, ती कुलूप बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे प्रवासी या स्वच्छतागृहाच्या बाहेरील परिसराचाच स्वच्छतागृहासारखा वापर करीत आहेत.
प्लॅटफॉर्मच्या बाहेरील बाजूने मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. दोन्ही बाजूच्या प्लॅटफॉर्मवर पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र काउंटर उभारण्यात आले आहेत. मात्र, त्याला पाणीपुरवठा होत नसून त्याचे नळ तुटले आहेत. स्थानकावर प्रवाशांना बसण्यासाठी आसन व्यवस्था केलेली नाही.
स्थानकात आलेली झाडेझुडपे, अपुरी कामे, स्वच्छतागृहाबाहेरील घाणीचे साम्राज्य यामुळे स्थानकाला बकालपणा आला असून रेल्वे प्रशासनाचे त्याकडे गंभीर दुर्लक्ष होत असल्याची तक्रार प्रवासी सोनाली गदादे, रामकुमार पांडे, सतिश शेळके, अरूण खेडेकर, राजेंद्र कदम यांनी केली आहे.
“काही महिन्यांपूर्वी येथील विविध सुविधा पुरविणारी कामे करण्यात आली आहे. मात्र रात्रीच्या वेळी येथे येणाऱ्या समाजकंटकांकडून या कामांची तोडफोड झाली आहे. याशिवाय अशाच लोकांकडून येथे घाणीचे साम्राज्यही पसरविले जात आहे. प्रवाशांची कुच्चमना होऊ नये व त्यांना सर्व सुविधा येथे मिळाव्यात यासाठी प्रशासनाला माहिती देऊन या सुविधा पुर्ववत करण्याबाबत कळविले जाईल. मात्र येथे येणाऱ्या नागरिकांनीही सार्वजनिक संपत्तीचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.”
ॲड. कृपाल पलुसकर
सदस्य, मध्य रेल्वे सल्लागार समिती
