प्रतिनिधी / अशोक आव्हाळे
मांजरी खुर्द (प्रतिनिधी) : पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने सन २०२६ चा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ अष्टापुर, माळवाडी येथील शिक्षक दिपक गायकवाड यांना प्रदान करण्यात आला. शिक्षण क्षेत्रातील तब्बल २० वर्षांच्या उल्लेखनीय सेवेसह विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी तसेच शाळेच्या भौतिक व शैक्षणिक विकासासाठी केलेल्या योगदानाची दखल घेत त्यांचा गौरव करण्यात आला.
पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, आमदार बापूसाहेब पठारे, आमदार शंकरभाऊ मांडेकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवलबाबा जगदाळे, उपाध्यक्ष विवेकदादा वळसे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, शिक्षण अधिकारी दहितुले मॅडम तसेच जिल्हा परिषदेचे सभापती व अधिकारी यांच्या उपस्थितीत गायकवाड यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.दिपक गायकवाड यांनी काटवन (रायगड), मांजरी खुर्द, आणि अष्टापूर माळवाडी आदी ठिकाणी शिक्षण सेवा बजावताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले.विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गोडी निर्माण करण्याबरोबरच जिल्हा परिषद शाळेच्या विकासात पालक, ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर गायकवाड यांनी आपल्या यशाचे श्रेय विद्यार्थी, पालक, शाळेच्या विकासासाठी योगदान देणारे पदाधिकारी, मार्गदर्शक शिक्षक, सहकारी शिक्षक, मित्रपरिवार तसेच कुटुंबीयांना दिले. आपल्या २० वर्षांच्या शिक्षण सेवेत लाभलेले विद्यार्थी आणि जिल्हा परिषद शाळेवर प्रेम करणाऱ्या पालकांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
“हा पुरस्कार माझ्या स्वर्गीय वडिलांना—आमच्या अण्णांना समर्पित करतो,” अशा भावनिक शब्दांत दिपक गायकवाड यांनी पुरस्काराबद्दल भावना व्यक्त केल्या. त्यांच्या या यशाबद्दल परिसरातील शिक्षक, पालक, विद्यार्थी व ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
