प्रतिनिधी /नूतन पाटोळे
मांजरी (प्रतिनिधी) : मांजरी खुर्द (ता. हवेली) येथील सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब शिवाजी पवार यांच्या सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना ‘समाजसेवा शिरोमणी पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. शिर्डी येथे रविवारी (दि. ६) झालेल्या २६ व्या अखिल भारतीय प्रतिभा महासम्मेलन व राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात पवार यांचा सन्मान करण्यात आला.
शिर्डी येथील हॉटेल साई पासो येथे आयोजित या पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. भारतीय सेनेच्या शौर्य, पराक्रम आणि अमर बलिदानाच्या गौरवशाली परंपरेला समर्पित या महासम्मेलनात बापूसाहेब पवार यांना समाजसेवेतील योगदानाबद्दल ‘समाजसेवा शिरोमणी’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
बापूसाहेब पवार यांनी सामाजिक बांधिलकी जपत विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. मांजरी खुर्द येथील सामाजिक कार्यकर्त्याचा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने गौरव झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे. या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यास रणजितसिंह सचदेव फाउंडेशनचे मार्गदर्शन लाभले असून विविध संस्थांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
