प्रतिनिधी /अशोक आव्हाळे
मांजरी (प्रतिनिधी) : शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे मंजूर असलेले, मात्र जागेअभावी प्रलंबित राहिलेले प्राथमिक आरोग्य केंद्र आता लवकरच प्रत्यक्षात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोरेगाव भीमा येथील उपलब्ध ६४ आर जागेच्या नियोजनाबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या विशेष बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. परिवहन विभागाने रस्त्यालगत व्यावसायिक कारणांसाठी आवश्यक असलेली जागा विकसित करावी आणि उर्वरित उपलब्ध जागा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उभारणीसाठी जिल्हा परिषदेकडे तात्काळ हस्तांतरित करावी, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.
प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जागेचा प्रश्न मार्गी लागल्याने कोरेगाव भीमा तसेच परिसरातील नागरिकांना सुसज्ज व दर्जेदार प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.ग्रामीण भागातील नागरिकांना उपचारासाठी दूरवर जावे लागू नये, यासाठी आवश्यक आरोग्य सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यास शासन कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले.या आरोग्य केंद्रामुळे कोरेगाव भीमा व परिसरातील नागरिकांना प्राथमिक उपचार, आरोग्य तपासणी, मातृ-बाल आरोग्य सेवा तसेच विविध शासकीय आरोग्य योजनांचा लाभ स्थानिक पातळीवर मिळण्यास मदत होणार आहे.
बैठकीस आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, जिल्हा परिषद सदस्या मोनिका हरगुडे, आरोग्य विभागाचे सचिव डॉ. राजेश देशमुख, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे) तसेच पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आदी उपस्थित होते.
