प्रतिनिधी / अशोक आव्हाळे
मांजरी खुर्द (प्रतिनिधी) : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) माध्यमातून मांजरी खुर्द येथे प्रस्तावित नगर विकास योजना क्रमांक १४, १५ व १६ राबविण्यास स्थानिक बाधित शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. सदर योजना शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक व जाचक असल्याने ती पूर्णपणे रद्द करून प्रक्रिया थांबवावी, अशी मागणी पीएमआरडीए प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
याबाबत मांजरी खुर्द व आव्हाळवाडीतील सर्व बाधित शेतकऱ्यांनी पीएमआरडीएचे अधिकारी विशाल वडाळ यांना राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. शिवदीप उंद्रे, आव्हाळवाडी गावचे उपसरपंच शरद आव्हाळे, बाळासाहेब नेवाळे, वसंत उंद्रे, आबासाहेब उंद्रे, माजी उपसरपंच विक्रम कुटे यांनी निवेदन दिले.
नगर विकास योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमिनीवर परिणाम होणार असून, शेती हेच उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन असल्याने जमीन अधिग्रहणामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट निर्माण होणार आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यापूर्वीही या योजनेला विरोध असल्याचे शेतकऱ्यांनी प्रशासनाला लेखी व तोंडी स्वरूपात कळविले आहे. तसेच संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांचे म्हणणे विचारात घेऊन योजना रद्द करण्याबाबत चर्चा झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, प्रशासनाकडून या भूमिकेचा गांभीर्याने विचार होत नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली.
पीएमआरडीएच्या नगर विकास योजनांची प्रक्रिया वेळखाऊ असून, मागील काही वर्षांतील योजनांमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान व मनस्ताप सहन करावा लागला आहे, असा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता या योजनेबाबत प्रशासकीय अथवा महसूल विभागात कोणतीही नोंद करू नये, अशी मागणी करण्यात आली आहे.
आंदोलनाचा इशारा
शेतकऱ्यांना विश्वासात न घेता नगर विकास योजना लादण्याचा प्रयत्न केल्यास सर्व बाधित शेतकरी तीव्र आंदोलन करतील, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही शेतकऱ्यांनी स्पष्ट केले. मांजरी खुर्द येथील शेतकऱ्यांचा विरोध व जनभावना लक्षात घेऊन नगर विकास योजना क्रमांक १४, १५ व १६ ची प्रक्रिया तात्काळ थांबवून योजना पूर्णपणे रद्द करावी, अशी मागणी बाधित शेतकऱ्यांनी केली आहे.
