प्रतिनिधी /अशोक आव्हाळे
मांजरी (प्रतिनिधी) : कोलवडी-साष्टे (ता. हवेली) येथील गायकवाड मळ्यातील गट क्रमांक १२९५ व १२९६ मधील पानंद रस्ता अखेर वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. शिरूर-हवेलीचे आमदार तथा पानंद व शिवरस्ते समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या प्रयत्नांतून तसेच उपविभागीय अधिकारी यशवंत माने आणि हवेली तालुक्याच्या अपर तहसीलदार तृप्ती कोलते यांच्या तत्पर कार्यवाहीमुळे हा प्रश्न मार्गी लागला असल्याची माहिती कोलवडी-साष्टेचे सरपंच विनायक गायकवाड यांनी दिली.
गायकवाड मळ्यातील पानंद रस्ता खुला करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्या कोमल संदेश आव्हाळे, हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे, पंचायत समिती सदस्या सुषमा संतोष मुरकुटे, सरपंच विनायक गायकवाड व उपसरपंच प्रिया दिगंबर गायकवाड यांनी वेळोवेळी लोकप्रतिनिधी तसेच महसूल विभागाकडे पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याने शेतकऱ्यांसाठी वाहतुकीचा मार्ग खुला झाला आहे.या कार्यवाहीसाठी स्थानिक तलाठी, मंडलाधिकारी, पोलीस अधिकारी, शेतकरी व ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केले. पानंद रस्ता खुला झाल्याने रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या शेतकऱ्यांना शेतमालाची वाहतूक, शेतीची कामे तसेच दैनंदिन ये-जा करणे सुलभ होणार आहे.
“पूर्व हवेली तालुक्यात महसूल विभागाच्या माध्यमातून अनेक शिवरस्ते व पानंद रस्ते वाहतुकीस खुले करण्यात येत आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लागत आहेत.कोलवडी-साष्टे येथील गायकवाड मळ्यातील पानंद रस्त्याचा प्रश्नही आता सुटला आहे. यासाठी आमदार माऊली कटके, आमदार बापूसाहेब पठारे, उपविभागीय अधिकारी यशवंत माने, अपर तहसीलदार तृप्ती कोलते तसेच महसूल, मोजणी व पोलीस विभागाचे गावच्या वतीने आभार मानतो.” असे सरपंच विनायक गायकवाड यांनी सांगितले.
“पानंद व शिवरस्ते खुले झाल्याने रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या शेतकऱ्यांना वाहतुकीचा मोठा फायदा होतो. त्याचबरोबर गावाच्या विकासालाही चालना मिळते. नागरिकांचे विविध प्रश्न मार्गी लागण्यासाठी संबंधित विभागांना शेतकरी व ग्रामस्थांनी सहकार्य करावे. नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे,” असे अपर तहसीलदार तृप्ती कोलते यांनी सांगितले.”
