प्रतिनिधी /अशोक आव्हाळे
मांजरी, ता. ११काम अपूर्ण असतानाही, तीन वर्षांपूर्वी वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला येथील रेल्वे उड्डाण पुल अद्यापही पूर्ण झाला नाही. त्यामुळे हा पूल वरच्या तसेच खालील भागात वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे, आणि वाहन चालकांना याची दररोज अनुभव येत आहे. परिणामी, पुलाच्या दोन्ही बाजूकडील सेवा रस्त्यांचा प्रश्न तातडीने सोडवून प्रवाशांना सुरक्षितता प्रदान करण्याची मागणी केली जात आहे.
या पुलाच्या दोन्ही बाजूच्या उतारांवर सेवा रस्त्यासाठी भूसंपादन रखडल्यामुळे रस्ते विकास अद्याप झाला नाही. त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूंवर सुरक्षा कठडे लावता आलेले नाहीत. सेवा रस्त्याची अनुपस्थिती असल्याने मागच्या सेवा रस्त्यातून येणारी वाहने थेट मुख्य रस्त्यावर येत आहेत, ज्यामुळे दोन्ही बाजूंवर वारंवार अपघाताची परिस्थिती निर्माण होत आहे.
पुलाच्या माथ्यावर मध्यभागी दोन्ही बाजूंनी पावसाचे पाणी व चिखल साठत आहे. हडपसरच्या बाजूने अर्धवट कामाचा फायदा घेऊन काही वाहनचालक पुलावरच वाहने पार्क करत आहेत. पुलावर दररोज झाडण काम होणारे मातीचे ढीग महिनोन्महिने उचलले जात नाहीत, आणि सध्या या ढिगार्यांवर गवत उगवले आहे. थोड्या पावसातही या ढिगाऱ्यातील माती पुन्हा रस्त्यावर पसरते.
पुलाखालील दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यांची अवस्था बिकट आहे. त्यावर काही ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. पुलाखाली जुनी वाहने, राडारोडा, तोडलेली झाडे, पुलाच्या कामाचे साहित्य आणि कचरा पडलेला आहे.जनावरे बांधलेली आहेत. भटकी कुत्री मोठ्या प्रमाणात वावरत आहेत.
रेल्वेरूळाखाली पादचाऱ्यांसाठी बनविण्यात आलेल्या भुयारी मार्गात चिखल व माती साठलेली आहे. राडारोडा टाकण्यासाठी पुलाखाली शिरणाऱ्या डंपरमुळे पुलाच्या खालील बाजूच्या बांधकामाचे टपरे उडाले आहेत. याशिवाय संपूर्ण पुलाखाली घाणीचे साम्राज्य ही पसरले आहे. त्यामुळे प्रवासी व आसपासच्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.”हा रस्ता अद्यापही महापालिकेकडे वर्ग झालेला नसल्याने त्याविषयी निर्णय घेता येत नाही. सार्वजनिक बांधकाम खात्याकडूनच भूसंपादनाची प्रक्रिया होईल. सध्या पालिकेकडून फक्त तात्पुरती देखभाल केली जात आहे.”
संदीप पाटील – कार्यकारी अभियंता, प्रकल्प विभाग
“पुलाखालील तसेच पुलावरील दुरावस्थेची माहिती घेऊन संबंधितावर कारवाई करण्यात येईल. याशिवाय सुरळीत व सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीनेची जी काही कार्यवाही करावी लागणार आहे, तीही केली जाईल.”
कुणाल धुमाळ – सहाय्यक आयुक्त,
हडपसर – मांजरी क्षेत्रीय कार्यालय
